नाशिक : एरवी खाकी वर्दीत गुन्हेगारीचा बिमोड करणाऱ्या नाशिकच्या पोलीस आयुक्तांचं नव रुप नाशिककरांना बघायला मिळतंय. पोलीस आयुक्त दीपक पांडे चक्क गोदावरी नदीत स्नान करतात, त्यांच्या जोडीला असतात 90 वर्षाचे त्यांचे वडील. त्यामुळे आयुक्तपदाचा थाटबाट सोडून गोदास्नान करणारा पहिला अधिकारी बघायला मिळतोय.
बिहार राज्यात गंगा नदी किनारी राहणाऱ्या दीपक पांडे यांची नाशिकला बदली झाली आणि दक्षिण गंगा म्हणून ओळख असणाऱ्या गोदामाईच्या दिशेने ते आकर्षित झाले. गेल्या दहा महिन्यापासून दीपक पांडे आणि त्यांचे 90 वर्षीय पिता शिवानंद पांडे रोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर गोदापत्रात स्नान करतात. एरवी चालताना काठीचा आधार घेणारे शिवानांद पांडे पाण्यात गेल्या गेल्या जो सूर मारतात तो बघून आपला आपल्या डोळ्यावरच विश्वास बसत नाही.
गोदावरी स्नानामागे धार्मिकता नाही तर शास्त्र आहे, नदीच्या वाहत्या पाण्यात प्रचंड ताकद असते, पंचमहाभूते स्नान इथे घडते. शरीरासाठी जल, वायू, सूर्यप्रकाश आवश्यक असल्यानं जल चिकित्सा करण्यासाठी इथे येत असल्याचे पांडे सांगतात. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर नदीकाठी पोस्टिंग झाली नव्हती, त्यामुळे नदीस्नान करण्याचा योग आला नाही, वडील 50 ते 60 वर्षांपासून गंगा स्नान करतात त्यामुळे इथे ते माझे गुरू आणि मी त्यांचा शिष्य असल्याचं दीपक पांडे सांगतात.
आयपीएस अधिकारी म्हटल्यावर सुखवस्तु आयुष्य, थाट बाट डोळ्यासमोर येतो, मात्र सर्वसामान्य नागरिकांबरोबर पोलीस अधिकारी ही गोदावरी नदीत स्नान करत असल्याने नागरिकांना त्यांच्यांविषयी कुतूहल वाटते. अधिकारीच गोदापत्रात स्नान करत असल्याने गोदावरी प्रदूषणमुक्त होईल गावकरी नदीपात्रात कचरा, नाल्यांचे पाणी टाकणे बंद करतील असा विश्वास सखाराम वाकोडकर यांच्यासारख्या नागरिकांना वाटतोय.
शहरी भागात नदी प्रदूषित असल्यानं रामकुंडात स्नान करण्याचं टाळून स्वच्छ पाणी शोधत शोधत पोलीस आयुक्तांनी शहराची हद्द ही ओलांडली. गोदा स्नानाचा दिनक्रमात एकाही दिवसाचा खंड नाही, मागील आठवड्यात गोदावरीला पूर आला तेव्हाही दीपक पांडे यांनी गोदा स्नान केले, आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करून देशभरात खळबळ उडवून दिल्यानंतर ही तेवढ्याच शांततेत गोदामाईच्या पाण्यात स्नानाचा आंनद लुटत होते.
गोदा स्नानानंतर नदीकाठी दोघे पितापुत्र श्वासाद्वारे मेंदूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायामाचे धडे गिरवतात करतात, एक दीड तास निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यानंतर अंगावर खाकी वर्दी चढविलेला रुबाबदार अधिकारी दैनंदिन कामकाजासाठी कार्यालयात दाखल होतो आणि गुन्हेगारीचा बीमोड करण्याच्या कामाला सुरुवात होते. सकाळी गोदा स्नानात मिळालेली ऊर्जा आत्मविश्वास, चेतना दिवसभर टिकते असा आयुक्तांचा दावा आहे.
दीपक पांडे यांच्या पंचमहाभूत स्नानाबाबत तज्ज्ञाकडून जाणून घेतले असता नदीचे पाणी रात्रभर स्थिर असते, चंद्राचा शीतल प्रकाश पडल्याने पित्ताचा नाश होतो, तर सूर्योदयवेळी नदीत स्नान केल्याने कफ, वात पित्त हे त्रिदोष मिटण्यास उपयोग होत असल्याचा आयुर्वेदाचार्य विक्रांत जाधव यांनी केलाय. नियुक्ती पासूनच दीपक पांडे चर्चेत आहेत, कधी ग्रीन ज्यूसच्या माध्यमातून, कधी हेल्मेटसक्तीच्या उपक्रमातून तर कधी थेट केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल करून. त्यात आता आणखी एका उपक्रमाची भर पडली, फक्त या उपक्रमाचा गोदामाई प्रदूषण मुक्तीसाठी जर उपयोग झाला तरी नाशिककर धन्य होतील.