Radhanagari Forest Sanctuary : जंगली डुक्कर आणि गव्याच्या शिकार करण्याच्या उद्देशाने सशस्त्र राधानगरी जंगल अभयारण्य क्षेत्रात घुसल्याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन डबल बॅरलची 12 बोअर गन आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.


विभागीय वनाधिकारी विशाल माळी म्हणाले की, "आमचे पथक पिरळ परिसरातील दुबलवाडी परिसरात गस्त घालत असताना रविवारी मध्यरात्री तीन जण संशयास्पद फिरताना आढळून आले. चौकशी केली असता त्यांच्याकडे डबल बॅरल 12 बोअर गन असल्याचे आढळून आले. सविस्तर चौकशी केल्यानंतर पिरळ गावातील चौगलेवाडी परिसरात राहणारे बळवंत महादेव चौगले, संजय विठ्ठल सुतार, उत्तम भाऊ चव्हाण या तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी शनिवारी रात्री कंदरमाळी परिसरातील विजय आनंद ऐकवडे यांच्या शेतात शिकारीसाठी गेल्याची कबुली दिली.


विजयला ताब्यात घेतल्यानंतर तीन शिकारींना डुक्कर आणि गव्याच्या शिकारीसाठी बोलावल्याचे कबूल केल्याचे माळी यांनी सांगितले. सदर आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये वन गुन्हे प्रथम अहवाल क्रमांक अन्वये वनगुन्हा नोंदवला असून दोन डबल बॅरल 12 बोअरच्या बंदुका, 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 


कोल्हापूर वनक्षेत्रामध्ये 8 वाघ कॅमेऱ्यात कैद


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील (Tigers in Kolhapur) वनक्षेत्रामध्ये तब्बल 8 पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या वाघांची झलक वनविभागाने (conservation reserves) लावलेल्या 22 ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (Tilari and Dodamarg) येथील जंगलामध्ये वाघांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. हे वाघ गोव्यातील म्हादेई वन्यजीव अभयारण्य आणि कर्नाटकातील काली आणि भीमगड वन्यजीव अभयारण्यातून येतात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली वनपरिक्षेत्रापर्यंत राधानगरीच्या दिशेने वर जातात आणि परत त्याच मार्गाने जातात.


वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली होती. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 पर्यंत दक्षिण कोकण आणि कोल्हापूरमधील तब्बल 22 ठिकाणांवर प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवले गेले. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून हालचाली टिपल्या गेल्या. कोल्हापूर कॉरिडॉरमध्ये प्रथमच आठ वाघ दिसून आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या