नाशिक: तणावाच्या पार्श्वभूमीवर खंडीत करण्यात आलेली इंटरनेटसेवा आज सुरु होत आहे. मात्र गेल्या सहा दिवसांपासून इंटरनेट बंद असल्यामुळे, या काळातील साचलेले मेसेज धडाधड मोबाईलवर येतील. मात्र जुन्या वादग्रस्त मेसेजवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


"जुने साचलेले संदेश दि. ९/१०/१६ ते १५/१०/१६ ह्या कालावधीत साचलेले मेसेज येण्याची शक्यता आहे. त्यावर विश्वास ठेवू नये. आजच्या परिस्थितीची माहिती घ्यावी समाजात तेढ निर्माण होईल अशी प्रतिक्रिया तात्काळ देवू नये", असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

नाशिक शहर ,जिल्ह्यात शांतता आहे.तालुक्यात अंजनेरी,तळेगाव,तळवाडे,वेळुंजे अंबोली,महिरावणी,खंबाळे ,वाढोली परिसरातही शांतता आहे. पोलीस बंदोबस्त चोख आहे.विनाकारण आपल्या चुकीच्या वर्तनाने शांतता बिघडवू नये, असं प्रशासनाने म्हटलं आहे.

अफवांचे जुने परंतु इंटरनेट सेवा सुरू झाल्याने आत्ता पोहोचले असे मेसेजेस,पोस्ट फोटो डिलिट करावे. ते सर्व जुने चुकीचे आहेत. घटनांची निट माहिती घ्या. पोलीस यंत्रनेचे सायबर सेल कार्यरत आहेत.

बारीक लक्ष असल्याने नाशिकला सायबर सेलचे गुन्हे दाखल झाले आहेत. ८ व्हाट्स अप ग्रुप अडमिनवर IT ACT अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.