रत्नागिरी: रत्नागिरीतल्या नाणीजमध्ये नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी एक वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वाद ओढावून घेतला आहे.


मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना, 'जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते, तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचं काम करते' असे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवली आहे. रत्नागिरीच्या नाणिजच्या नरेंद्र महाराजांच्या 50 व्या वाढदिवस समारंभात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, हंसराज अहिर, हरीभाऊ बागडे, सदभाऊ खोत, नाना पटोले, दादा इदाते, विनायक राउत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपूस समाचार घेताना, राजसत्ता संपुष्टात आली म्हणून ते धर्मसत्तेचा आधार घेत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे आणि मग धर्मसत्ता करावी असा टोलाही लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याला अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही विरोध केला होता.