मुंबई : खासदार नारायण राणेंच्या भाजपत जाण्याच्या निर्णयानंतर आता छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशावरुन शिवसेनेत खलबत सुरु झाली आहे. “राणे तुमचे तर, भुजबळ आमचे” अशी चर्चा आता शिवसेनेत सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी भुजबळांना शिवसेनेत घेण्याची शक्यता आता वर्तवली जातं आहे.

छगन भुजबळासह पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांनाही विधानसभेसाठी तिकीट मिळावं यासाठी भुजबळ प्रयत्नशील आहे. येवला, नांदगाव किंवा भायखळा नाशिक मध्य किंवा वैजापूर विधानसभेची भुजबळांची शिवसेनेकडे मागणी आहे. भुजबळांना शिवसेनेत घेतल्यास छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ दोन आमदारांची ताकद वाढू शकते.

VIDEO | नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर छगन भुजबळ शिवसेनेत? | ABP Majha



नारायण राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक मानले जातात त्यामुळे राणेंच्या प्रवेशाने कोकणात शिवसेनेच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तर भुजबळांच्या प्रवेशानं नाशिकमध्ये भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं बोललं जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार, खासदार यांनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि भुजबळांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. यावर भुजबळांना शिवसेनेत घेतलं जाणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरेंना सर्वांना दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती.

संबंधित बातम्या