पुणे : पुण्याच्या हिंजवडीमधील चांदणी चौकात सैराट चित्रपटाचा थरार घडला आहे. पुतणीशी आंतरजातीय विवाह केल्यावरून चुलता, भाऊ आणि त्याच्या मित्रांनी तरुणावर पाच गोळ्या झाडल्या. ही घटना काल रात्रीच्या सुमारास चांदणी चौकातील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर घडली आहे.


तुषार प्रकाश पिसाळ (वय 20) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे, सागर पालवे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार आणि विद्या यांचा काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला आहे. या विवाहासाठी विद्याच्या घरच्यांची संमती नव्हती. बुधवारी तुषार आणि त्याचे दोन मित्र तानाजी आणि बबन मोटारसायकलवरून एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्नावरून परतत असताना ते चांदणी चौकातील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर पोहोचले.

अहमदनगर 'सैराट' हत्याकांड, मुलीसह जावयाला पेटवणाऱ्या नराधम बापाला अटक

पेट्रोल पंपासमोर विद्याचे चुलते राजू तावरे, तिचे भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी तुषारला घेराव घातला. राजू तावरे याने तुषारवर पिस्तूल रोखून मागून व पुढून अशा एकूण पाच गोळ्या झाडल्या.

वर्ध्यात 'सैराट', पळून गेलेल्या बहिणीच्या सासूची निर्घृण हत्या

या हल्ल्यात तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी तुषारला शिवीगाळ करुन घटनास्थळावरून पळ काढला. तुषारवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.