Rohit Pawar drew attention by exposing 11 scams : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचीच यात्रेत छेडछाड झाल्याने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. पुण्यातील बलात्कार प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेली शिक्षा, वाल्मिक कराड सूत्रधार निघाल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणीत झालेली वाढ या सर्व पार्श्वभूमीवर आजपासून (3 मार्च) सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महायुती सरकारला घेण्यासाठी विरोधकांकडून दारुगोळा एकत्र करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पुस्तिकांच्या माध्यमातून घोटाळ्यांची मालिकाच एकत्रित केली आहे. यामधून 11 घोटाळ्यांकडे लक्ष वेधले आहे. 


सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्याच दिवशी 'दलालीची दलदल' या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधलं आहे. महायुती सरकारच्या 11 घोटाळ्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजनपुरवठा घोटाळा, एमएसआईडीसी घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, एमआयडीसी जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, एमएसआरडीसी घोटाळा, रक्तपेढी परवानगी घोटाळ्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं महायुती सरकारचं सूत्र असून दलालीच्या पैशातून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याची मनसुबे असल्याचा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे. 


काय म्हणाले रोहित पवार? 


नवीन योजना जाहीर केल्या म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडू शकत नाही. गेल्या अडीच वर्षात सत्ताधाऱ्यांनी खाल्लेली दलाली हे महाराष्ट्राची तिजोरीखाली होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. गेल्या अडीच वर्षात या सत्ताधाऱ्यांनी 50 हजार कोटींहून अधिक दलाली खात महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत गाडले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील सामान्य कुटुंबातील लोकांना सेवा देण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये या सरकारने दलाली खाल्ली. एमएसआयडीसी घोटाळा, एमएसआरडीसी घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, आश्रमशाळामधील दूध घोटाळा, सामाजिक न्याय विभागातील भोजन पुरवठा घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा एमआयडीसी घोटाळा यासारखे 50 हजार कोटींहून अधिकची घोटाळे मी स्वतः कागदपत्रांसह मांडले. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असंच महायुती सरकार सूत्र असून दलालीच्या पैशातून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्यात विकत घेण्याचे मनसुबे असल्याचा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे. 


दलदलीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही


रोहित पवार यांनी पुढे म्हटला आहे की महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत अडकून पाहणाऱ्या सत्ताधारी दलालांचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचं होतं आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे केलं आणि भविष्यातील करत राहणार आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी या प्रयत्नांना महाराष्ट्रातील तमाम जनतेची साथ मिळणे गरजेचं आहे. मराठी माणूस स्वाभिमानी असल्याने तशी साथ निश्चितच मिळेल असा विश्वास आहे. आपण सर्वजण मिळून महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या आणि महाराष्ट्र लुटून खाणाऱ्या दलालांना त्यांनीच करून ठेवलेल्या दलदलीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही या निर्धाराने विधानसभा निवडणुकीला समोर जाऊया असं रोहित पवार यांनी आपल्या प्रस्तावनात म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या