औरंगाबाद : हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीवरून सध्या राज्यात बरीच चर्चा झाली. अगदी हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही इथपर्यंत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या विद्यार्थ्यानी विकसित केलेली एक यंत्रणा चर्चेत आहे. हेल्मेट न घातल्यास दुचाकी सुरुच होणार नाही, अशी यंत्रणा या विद्यार्थ्याने शोधलीय. रोहित पाटसकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.


हेल्मेट घातले नाही तर दुचाकीचं इंजिन सुरूच होत नाही. इतकेच नव्हे, तर गाडी चालवताना हेल्मेट काढल्यास गाडीही बंद पडते, अशी यंत्रणा औरंगाबादच्या विद्यार्थ्यानी शोधली आहे. ‘वायरलेस हेल्मेट इग्निशन सिस्टिम’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पासाठी हेल्मेटसह एक हजार रुपये खर्च आला आहे.

रोहित पाटसकर इंडोजर्मन टुलरूम औरंगाबाद या महाविद्यालयात इंजीनियरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतो आहे. त्याने हा प्रकल्प तयार केला आहे. रोहितने प्रवास करताना एक अपघात पहिला. अपघातात मृत व्यक्तीन हेलमेट घेतले नव्हते. त्यामुळे त्याचा जीव गेला. त्याने पुढे अशा अपघातात कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून हा प्रयोग केला.



‘वायरलेस हेल्मेट इग्निशन सिस्टिम’ कशी चालते?

या यंत्रणेमध्ये हेल्मेटच्या वरच्या भागात एक स्विच बसवण्यात आला आहे. हेल्मेट घातले की स्विच दाबले जाऊन सर्किट पूर्ण होते. त्यानंतर त्यातून एफएम वेव्हज बॅटरी आणि इग्निशन कॉइलमध्ये बसवलेल्या रिसिव्हरकडे पाठवण्यात येतात. रिसिव्हर ते रिसिव्ह करून त्याचे विजेत रुपांतर करतो. तिथे जोडलेला रिले या लो करंटचे हाय करंटमध्ये रूपांतर करून इग्निशन कॉइल सुरू करतो आणि त्याद्वारे टू व्हिलर सुरू होते.

 औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांकडून कौतुक

 किक स्टार्ट आणि बटण स्टार्ट या दोन्ही प्रकारच्या गाड्यांमध्ये ही यंत्रणा वापरता येते. केवळ गाडी सुरू करतानाच नव्हे, तर गाडी सुरू असतानाच हेल्मेट काढल्यासही सर्किट ब्रेक होऊन गाडी बंद पडते. या प्रयोगाचं ओरंगाबाद पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केले आहे.

हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्मेट नसताना अपघात झाल्यास थेट मेंदूला इजा होऊन गंभीर दुखापतीची शक्यता असते. हेल्मेटसक्ती केली गेली, तरी अनेक जण हेल्मेट टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवताच येणार नाही हा जालीम उपाय या विद्यार्थ्याने शोधला आहे.