नाशिक : वादग्रस्त किर्तनामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेले इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि याला कारण ठरणार आहे ते म्हणजे ईगतपुरी तालुक्यातील घोटीमध्ये सोमवारी पार पडलेला त्यांचा किर्तनाचा सोहळा. तुम्ही आणि मी नशीबवान आहे की,  दुसऱ्या लाटेतून वाचलो. आता हा आपला पुनर्जन्म आहे. एकतर दिड वर्षातून आज तुम्ही आम्ही हसलो. देवाने 2020 साली जीआर काढला. खोकला की साडेतीन लाखाला ठोकला. त्यामुळे काही जण खोकला दाबून मेले पण खोकले नाही, असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमाने लाच घेतली असती तर या नालायकांनी खालून वर चेक पाठवला असता आणि म्हतारा खाली घेतला असता अशी टीका देखील डॉक्टरांवर केली. 


कोरोनावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत डॉक्टरांची खिल्ली उडवलीय यासोबतच महिलांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या 81 व्या जयंती निमित्ताने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचशेहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.


अंडी खायची असल्याने 40 टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या


कोरोनाकाळात  सराव नसल्याने 40 टक्के कीर्तनकार हरिपाठ विसरले. उतपन्नच नाही तर हरिपाठ काय करणार आहे.  40 टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. कोणीतरी अंडी खाल्ली की कोरोना होत नाही असे सांगितल्यावर सर्वांनी अंड्यावर उड्या मारल्या. ते माळ काढत नव्हते पण बायको म्हणायची की माळ काढा तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाकडे पाहावं. कोणीतरी म्हणे काढा प्यायला की कोरोना होत नाही. चहा, दूध सोडून काढा प्यायला लागली मंडळी आणि नुसती आग निघायला लागली.


वारकरी जरा जागेवर या आणि एका झेंड्याखाली जगायला शिका 


सगळ्या लॉकडाऊनचा त्रास फक्त वारकऱ्यांना झाला आहे.  दिड वर्ष आम्ही दुष्काळात  काढला आम्ही खूप वाईट दिवस काढले. तमाशा, जागरण गोंधळ करणारे आणि सांप्रदायिक मंडळींनी दुःख काढले. बाकी कोणालाही त्रास झाला नाही. वारकरी जरा जागेवर या आणि एका झेंड्याखाली जगायला शिका याला त्याला नाव ठेवणं बंद करा.  25 टक्के गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यात दागिने राहिले नाही. आळंदीमध्ये हजार मुलं कंपनीत कामाला गेले. कारण त्याला पोट भरायला काही नव्हते . दोन दिवसांवर सण आला सगळ्यांना अनुदान आहे.  ज्यांनी धर्म टिकवला त्यांची वाट लावली.


ऑक्सिजन फक्त श्रीमंतांना मिळाला


सगळ्या लोकांनी झाडे लावली असती तर ऑक्सिजन अभावी लोक मेली नसती. फक्त खरे कोणी बोलायचे नाही.. नाहीतर ऑक्सिजन फक्त श्रीमंतांना  मिळाला. गरीब लोकं खाटांवर तडफडून मेली. कोरोना झालेल्या माणसाला यम त्रास देणार नाही एवढा त्याच्या घरच्यांनी दिला.  75 टक्के लोक टेन्शनने गेली आणि घरच्यांनी घालवली. डॉक्टरच्या हाता खालच्या मुलांनी पण हातात गोळ्या नाही दिल्या, फेकून दिल्या. फक्त कलेक्ट दि मनी हा व्यवसाय सुरू झाला.


बाळासाहेब थोरात यांनी भाषणात बोलतांना इंदुरीकर महाराज हे आमच्या तालुक्यातील आहे आणि ते व्यक्तिमत्वच असं आहे की जे प्रबोधन करतात पण खसकून करतात साधेसुधे करत नाही, जे चुकीचे घडते त्याच्यावर नेमकं मर्मावर बोट ते ठेवतात आणि समाजात नक्की बदल होतात असं म्हणत थोरात कार्यक्रमातून निघून गेले आणि त्यानंतर मात्र इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी उभे राहताच त्यांनी त्यांच्या शैलीत कीर्तन तर सुरु केले मात्र सरकार, डॉक्टर यांच्यावरच त्यांनी तोफ डागली. विशेष म्हणजे मला त्या मोबाईल क्लिपचा खूप त्रास झाला असं सांगत असतानाच वारकऱ्यांनो एका झेंड्याखाली या असे आवाहनही त्यांनी सर्व वारकऱ्यांना केले आहे.