लातूर : राज्यभरात मुन्नाभाई एमबीबीएसचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. सहा हजार रुपयांची तपासणी 1200 रुपयात करुन, रुग्णांच्या जीवनाशी खेळ केला जातोय. जागतिक डॉक्टर दिनी लातुरातील बोगस संस्था आणि डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमका प्रकार काय आहे?
पुण्यातील एका हॉस्पिटलचे नाव, नागपुरातील सेवाभावी संस्था आणि शिबीर लातुरात, अशी योजना आखून बोगस डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांचे एक पथक लातुरात आले. जोरदार बॅनरबाजी करुन जाहिरात करण्यात आली. 6000 रुपयांची तपासणी अवघ्या 1200 रुपयात करण्याचे सांगण्यात आले. यासाठी लातुरातील एक हॉल भाड्याने घेण्यात आला. त्यांची टीम कामाला लागली. संगणक, तपासणी करणारे यंत्र लावण्यात आले आणि सुरु झाली डॉक्टर मुन्नाभाईचा तपासणीचा खोटा खेळ. संगणकावर आरोग्य तपासणीचे सॉफ्टवेअर. हात पॅडवर ठेवले की आरोग्य तपासणी पूर्ण. तपासणी करणारे तंत्रज्ञ हे बीए फर्स्ट ईयरचे. डॉक्टर हे बीएचएमएस झालेले सांगतात, मात्र त्यांच्या शिक्षणाबाबतही शंकाच आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळ
लातूर शहरात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे हे त्याचे तिसरे शिबीर सुरु होते. राज्यभरात मागील पाच वर्षात हजारो शिबीर पार पाडण्यात आली आहेत. हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, किडनी विकार, पोटाचे रोग, त्वचारोग यांसारखे सर्व रोग निदान शिबीर वेळोवेळी घेण्यात आले आहेत. यातून लाखो रुग्णांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ करुन लाखो रुपये कमावण्यात आले आहे.
लातूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बॅनरवरुन शंका आली आणि त्यांनी शिबिराच्या ठिकाणी जाऊन बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे पाडले. या पथकाने रुग्ण, मशिन्स, डॉक्टर यांची माहिती घेतली असता हे सर्व बोगस असल्याचे उघड झाले.
इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर यांनी प्रथम एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. तसेच, लेखी निवेदनही दिले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी कागदोपत्री प्रक्रिया करेपर्यंत हे बोगस डॉक्टर गायब झाले. इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरचे अध्यक्ष रमेश भराटे, सचिव जितेन जयसवाल, चिंते डी एन, आमिर शेख, जी आर सोमवंशी, अनिल स्वामी, सुधाकर सुडे, ज्योती सूळ यांनी हा गोरखधंदा उघड केला आहे.
लातुरात ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा सुळसुळाट
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
01 Jul 2018 05:09 PM (IST)
पुण्यातील एका हॉस्पिटलचे नाव, नागपुरातील सेवाभावी संस्था आणि शिबीर लातुरात, अशी योजना आखून बोगस डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांचे एक पथक लातुरात आले आणि गोरखधंदा सुरु केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -