धुळे : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन संतप्त जमावाने पाच जणांची हत्या केली. साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर ही खळबळजनक घटना घडली आहे.


राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन आज (1 जुलै) दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली.

मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, आप्पा श्रीमंत भोसले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते.

या मारहाणप्रकरणी आतापर्यंत 15 ताब्यात घेण्यात आले आहे.

राईनपाडा गावात सध्या तणावाचे वातावरण असून, पोलिस अधीक्षकांसह मोठा पोलिस फौजफाटा गावात दाखल झाला आहे.

पाचही जण सोलापुरातील

संतप्त जमावाच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पाचही जण सोलापुरातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादाराव भोसले असे त्यातील एकाचे नाव आहे. ते सोलापुरातील होते. आतापर्यंत केवळ एकाचीच ओळख पटली आहे. इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच, मारहाण करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही गृहराज्यमंत्री केसरकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे उद्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून, राईनपाडाला जाऊन घटनास्थळाला ते भेट देतील.