पाकच्या तावडीतून सुटलेला जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यात परतणार!
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2017 11:19 AM (IST)
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर उद्या धुळ्यात परतणार आहे. खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः चंदूला घेऊन धुळ्यात आणणार आहेत. चंदू गावी परतणार असल्यानं त्यांच्या नातेवाईंकांसह संपूर्ण ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. 29 सप्टेंबरला नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला चंदू चव्हाणची 21 जानेवारीला पाकिस्ताननं सुटका केली होती. दरम्यान, भारतात परतल्यानंतर चंदूला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान, त्याच्यावर उपचारही सुरु होते. अखेर चंदू उद्या आपल्या गावी परतणार आहे. चंदू मुळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा आहे. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. त जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदूनं चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला होता. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं होतं. चंदू चव्हाणला भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाणला मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. अखेर पाकिस्तानने चंदू चव्हाणची सुटका केली. कोण आहेत चंदू चव्हाण? चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचा. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाला. 22 वर्षीय चंदूनं दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदूचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहे.