जालना: जालन्यातील परतूरमधील राष्ट्रवादीचे नेते बळीराम कडपे यांच्या घरासह दुकानावर अवैध सावकारी केल्याप्रकरणी धाड टाकण्यात आली. औरंगाबाद येथील विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावरून परतूरच्या सहनिबंधकांनी ही धाड टाकली. या धाडीत खरेदी खत, सातबाराच्या प्रती, मुद्रांक शुल्क पेपर, फेरफारसह महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आला आहे.


परतूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बळीराम कडपे यांच्यासह आश्रोबा कडपे यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी करत असल्याच्या तक्रारी औरंगाबादच्या विभागीय सहनिबंधकांकडे केल्या होत्या या तक्रारीची दखल घेत परतूर तालुक्यातील आष्टी येथील बळीराम कडपे यांच्या राहत्या घरासह आडत दुकानावर अचानक छापा टाकून महत्वाची कागदपत्रे जप्त केली.

दरम्यान, बळीराम कडपे हे परतूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. यावेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बळीराम कडपे यांनी राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आव्हान उभं केल होत. दरम्यान, याच आकसापोटी सूड बुद्धीने लोणीकरांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केल्याचा आरोप कडपेंनी केला आहे.