सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपूर्वी घुसलेला गवा रेडा अजूनही मोकाटच आहे. पण वनविभाग मात्र 'आलेल्या मार्गे गवा परत जाईल' या आशेनं हातावर हात ठेवून गप्प बसल्यानं, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सांगली शहराच्या भरवस्तीत रविवारी रात्री अचानक गवारेडा घुसला. गणपती पेठ परिसरात तसंच गवळी गल्लीमध्ये गवारेड्यानं आपली वर्दी दिली. त्यामुळे काहीकाळ सांगलीकरांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

परिसरातील युवकांनी गव्याचा पाठलाग केल्यामुळे त्यानं नदी काठावर धूम ठोकली. अंधाराचा फायदा उठवत रेडा पसार झाला. मात्र रात्री उशिरा वन विभागानं गव्यासाठी शोधकार्य सुरु केलं होतं.

वन विभागाने सुरुवातीचे 2 दिवस पायाच्या ठशाच्या मदतीने गव्याचा पाठलाग केला. मात्र, वन विभागाला तुरी देत गवा पद्माळे गाव आणि कृष्णा नदीकाठालगतच घुटमळत राहिला. त्यामुळे 'गेला गवा रेडा कुणीकडे' असं म्हणण्याची वेळ सांगलीच्या वन विभागावर आली आहे.

दरम्यान, पद्माळे गावाजवळच्या शिंदे मळ्यातील एका गोठ्यात परवा रेडा घुसला होता. यावेळी त्याची एका म्हैशीसोबत झटापट देखील झाल्याचे नागरिक सांगत आहेत. नदी काठचा भाग असल्याने  ऊसामध्ये रेडा बसून राहतो, आणि रात्री बाहेर पडतो.  त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत.