धरमशाला : श्रीलंकेविरुद्ध कसोटीतील विक्रमी मालिका विजयानंतर आता तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या या मालिकेतील पहिला सामना आज धरमशालामध्ये खेळवला जाणार आहे.


या मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा रोहित शर्मावर सोपवण्यात आली आहे. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं संघात पुनरागमन झालं असून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि महेन्द्रसिंग धोनी या अनुभवी शिलेदारांवर प्रामुख्यानं फलंदाजीची मदार राहील.

टीम इंडियाचा शिलेदार केदार जाधव या मालिकेला मुकणार आहे. दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आजपर्यंत भारतात झालेल्या नऊ वन डे मालिकांपैकी आठ मालिका टीम इंडियानं आपल्या खिशात घातल्या आहेत, तर एक मालिका अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेनंतर आता वन डेतही श्रीलंकेला मात देण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल.