सांगली : सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत ही वाढ झाली आहे. कृष्णेच्या पाण्याची पातळी 24 फुटांवर पोहचली आहे, तर वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृष परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 19 फूट होती. मात्र आज या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. यामुळे कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत असून नदीतील मौजे डीग्रज येथील बंधारा आणि सांगली बंधारा पाण्याखाली आहेत.
कोयना जलाशयात पाण्याची आवक वाढल्यामुळे सकाळपासून 45 ते 48 हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पात्राबाहेर पडलेल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.
तर दुसरीकडे सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळी वाढल्याने वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलं आहे.
पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने शिरलामधील आरला, शितूर पूल पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेता पाटबंधारे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.