कोल्हापूर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतर पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच, पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घर तसंच साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला.


आयकर विभागाची टीम आज (25 जुलै) पहाटे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली. आयकर विभागाने हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या घरासह टाकळा परिसरात राहणारे त्यांच्या साडूच्या घरावरही छापा टाकला आहे. परंतु छाप्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या छाप्यांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहेत हसन मुश्रीफ?

- हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
- ते कोल्हापुरातील कागल मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व करतात.
- हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातलं मोठं नाव असून शरद पवारांच्या जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात.
- राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मुस्लीम चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे.
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला होता.