हिंगोली : औंढा नागनाथ येथील 8वे जोतिर्लिंग असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्यांच्या सन्मानार्थ उभरण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला होता. अखेर या पुतळ्याचे अनावरण धनगर समाजाच्या ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते आज सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आल्याने पुतळ्याच्या अनवरणावरून सुरू झालेल्या वादाला पुर्णविराम मिळालाय.
कोरोनामुळे वारंवार या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रखडले होते. शेवटी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावरण आपण 16 मार्च रोजी करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर 11 मार्च रोजीच या पुतळ्याचा अनावरण करणार असल्याचं शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी जाहीर केलं होतं. मात्र, कोरोना आणि महाशिवरात्रीमुळं जास्त गर्दी जमू नये यामुळे प्रशासनाने या ठिकाणी परवानगी नाकारली होती. मात्र, दुपारी आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेऊन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरच हा सोहळा साजरा करण्याचा निश्चय केला व औंढ्यात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतली व धनगर समाजातील 100 वर्षीय ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील मारकड यांच्या हस्ते कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत साधेपणाने मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाले.
यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी आमदार रामराव वडकुते, अशोक नाईक, नगरसेवक राम कदम नागनाथ संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार कृष्णकांत कानगुले, बाबा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते नागनाथ संस्थांचे सदस्य ॲडव्होकेट राजेश पतंगे, ॲड रवी शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, केशव नाईक, सुरेंद्र ढाले, शिवाजी ढाले, शशिकांत वडकुते, विनोद नाईक गंगाप्रसाद पोले, लखन शिंदे, शंकर पोले, शिवम नाईक विलास मस्के, संभाजीराव देवकते, विलास पोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.