सोलापूर : सोलापुरात आज (गुरुवारी) एका दिवसात सर्वाधिक तब्बल 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला आहे. या 29 रुग्णांच्या वाढीमुळे सोलापुरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 182 वर पोहोचली आहे.
कालपर्यंत (बुधवार) हा आकडा 153 इतका होता. सोलापुरातील पाच्छा पेठेतील एका महिलेचा मृत्यूदेखील कोरोनामुळे झाल्याचे आज आलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले. मृत्यू झालेली 48 वर्षीय महिला 6 तारखेला पहाटे उपचारासाठी दाखल झाली होती. उपचार सुरु असताना 6 तारखेलाच दुपारी 3 वाजता महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आज या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आज आढळून आलेले सर्व रुग्ण हे सोलापूर शहर परिसरातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत सोलापूर शहर परिसरात एकूण 179 रुग्ण आहेत त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सांगोला, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी एक असे एकूण 3 रुग्ण अढळलेले आहेत. यामधील मोहोळ तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
आतापर्यंत सोलापुरात कोरोनामुळे 11 जणांनी आपले प्राण जमावले आहेत. यामध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ही समावेश आहे. सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचा 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला. 5 एप्रिल रोजी त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. "ताजुद्दीन शेख यांचा कोरोना विरुद्ध लढताना दुःखद मृत्यू झाला. पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत आहेत", असं ट्वीट करता महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे सोलापुरातील पोलीस दलात ही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
याआधीच सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस विभागात कोरोनाचा शिरकाव पाहता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने खबरदारीचे निर्णय घेतले आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस विभागातील 55 वर्षापुढील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य न बजावता घरी राहण्याचे आदेश अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. तर 50 वर्षापुढील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली असून कोरोना संदर्भात कर्तव्य न देण्याचे निर्णय देखील यावेळी घेण्यात आले आहेत.