Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत घोषणा केली. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा जन्मदिवस दिवस आहे. याचं औचित्य साधून 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनातर्फे 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन जाहीर केलं. या निमित्ताने सरकराकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी ठेवला होतो, जो सरकारने स्वीकारला आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा होणार!


मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान असून त्यांना अभिवादन करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती."






दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारचा हा निर्णय म्हणजे काँग्रेसला उत्तर आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.


स्वातंत्र्यवीरांवरुन राजकारण पेटलं


दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यांच्या देशभक्तीवरुन वाद निर्माण झाले आहेत. सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती आणि सेल्युलर जेलमधून सुटल्यानंतर ते पेन्शनवर होते, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर भाजप पक्ष आक्रमक झाला. भाजपने राज्यभरात स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढली. तसंच ठाकरे गटावरही हल्लाबोल केला होता. ठाकरे गटावर हल्लाबोल करत भाजपने वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत कसे राहू शकता, असा सवाल भाजपने विचारला होता. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. तर राहुल गांधींनी अशी वक्तव्ये करणं टाळावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.