नागपूर : नागपुरात आज महाराष्ट्राच्या महापौर परिषदचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या हस्ते झाले. राज्यातील डबघाईला आलेल्या काही महापालिका आणि एकूणच कारभार बघता या दोन्ही नेत्यांनी राज्यभरातील महापौरांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. यावेळी बोलताना फडणवीस ह्यांनी सांगितले की जगात तेच हुशार आहे, असे काही IAS अधिकाऱ्यांना वाटत असते. ते हुशार असतातच पण आपल्यालाही काही व्यावहारिक ज्ञान असते. त्याचा फायदा करण्याचा सल्ला राज्यातून आलेल्या ह्या महापौरांना स्वतः नागपुरचे महापौर राहिलेल्या फडणवीसांनी दिला.


महापौर परिषदेचे अध्यक्ष आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौंराना जास्त अधिकार देण्याबाबत वकिली केली आणि अधिकार पाहिजे तसे नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी वरचढ होत असल्याचे मत व्यक्त केले.

यानंतर गडकरी आणि फडणवीस दोघांनीही महापौरांचा चांगलाच समाचार घेतला. अधिकाराचा गैरवापर हा थेट जेल मध्ये पोहचवू शकतो असे म्हणत गडकरींनी दक्षिण कोरियाच्या जेल मध्ये जात असलेल्या पंतप्रधानांचे उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गडकरींनी अनेक योजना सांगितल्या, पण एक योजना त्यांनी सांगितली नाही, की नागपुरात आपण नवीन जेल बांधतोय. त्याचा महापौरांशी काही संबंध नाही, पण सांगतोय असे म्हणत राज्यातील महापौरांच्या कानपिचक्या घेतल्या.

महापौर परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे
- शहरांना डपिंगसाठी जागा मिळणार नाही
- कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आणि मदत
- महानगरपालिकांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी
- मुंबईत 21 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार
- 3 वर्षात एमआयडीसीला फ्रेश पाणी बंद करणार
- एमआयडीसीला त्या-त्या महानगरपालिकेकडून सांडपाणी घेऊन त्यावर प्रक्रिया करावी लागेल
- महापौरांना वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार देणार