अहमदनगर : अकोले तालुक्यात दुषित पाण्यामुळे 50 शाळकरी मुलांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपळदरी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील शाळेतील ही घटना आहे. दुषित पाण्यामुळे संस्थेतील 73 मुलांपैकी 50 मुलांना त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना कालपासून जुलाब, उलटी आणि पोटदुखीचा त्रास होत होता. उपचारासाठी या सर्व मुलांना संगमनेरमधील घारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरा 50 मुलांपैकी सहा लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.


प्राथमिक उपचारानंतर 40 मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचावर प्रवरा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गजानन मोरे यांनी दिली.


पिंपळदरी गावात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. मुलांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. पिंपळदरी गावात असणाऱ्या आश्रमशाळेतील मुलांनाही अशाप्रकारे त्रास झाला असल्याचं समोर येत आहे.