मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय पंतप्रधान मोदींनी केला असून देशाची पावलं त्याच दिशेने सुरु आहेत. देशभरातील 22 हजार गावात आता ग्रामीण कृषी मार्केटचं जाळ उभं करून 2022 पर्यंत भारत 33 बिलियन हुन 66 बिलियन एव्हढा कृषी माल एक्स्पोर्ट करणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी नेमल्येल्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी दिली आहे.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या 22व्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. ज्याचे उदघाटन केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे अभ्‍यास समितीचे अध्‍यक्ष डॉ अशोक दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत देशातील कृषी धोरण स्पष्ट केले.

2022 ला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. शिवाय महात्मा गांधींची 150वी जयंतीही असल्याने 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असून एक मास्टर प्लानही त्यासाठी आखण्यात येत आहे. ज्यात यापुढे देशातील शेतकऱ्यांना केवळ बाजार समित्यांवर अवलंबून रहाव लागणार आहे. गावातील माल गावातच विकत घेतला जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर 22 हजार गावात ग्रामीण कृषी मार्केटही सुरू केले जाणार असल्याचे डॉ. अशोक दलवाई यांनी सांगितले.

डॉ. अशोक दलवाई पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण कृषी मार्केट त्यावर बाजार समिती आणि खाजगी बाजार समित्या या दोन्हीच्या वरती थेट एक्स्पोर्ट मार्केट केले जाणार आहे. ज्याच्या माध्यमातून आपला याच साली 33 हजार 33 बिलियन अमेरिकन डॉलरहून 66 बिलियन अमेरिकन डॉलर एवढा कृषी माल एक्स्पोर्ट करण्याचा संकल्प आहे. ज्याने शेतकऱ्यांच्या मालाला भावही मिळेल आणि त्यांचे उत्पन्नदेखील दुप्पट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी सरकार सुभाष पाळेकर यांची पद्धत सुद्धा वापरणार असल्याचे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.