कॉ. पानसरेंच्या हत्येमागे चौघेजण, पोलिसांचा आरोपपत्रात दावा
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2017 01:58 PM (IST)
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण असल्याचा दावा पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रामध्ये केला आहे. कॉ. पानसरेंच्या हत्येमध्ये वापरलेल्या 2 पिस्तुलांपैकी एक पिस्तुल डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत, तर दुसरी पिस्तुल कलबुर्गींच्या हत्येत वापरल्याचा दावाही या आरोपपत्रामधून पोलिसांनी केला आहे. समीर गायकवाड हा कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा ठपकाही आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. आज समीर गायकवाडच्या जामीन अर्जावरच्या सुनावणीवेळी या बाबी उघड झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी समीर गायकवाडला ओळखले आहे. त्यामुळे त्याला जमीन देऊ नये, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला. शिवाय, जामीन दिल्यास समीर गायकवाड फरार होईल, अशी भीतीही हर्षद निंबाळकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.