पुणे : गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही, तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे.
मान्सूनचा वेग मंदावला
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी माहिती देताना सांगितले की, मान्सूनच्या वाऱ्यांचा जोर कमी झाल्याने, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमी दाबाचे क्षेत्र विरले आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील दबावाचाही प्रभाव कमी होणार आहे. कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असून, त्यानंतर तेथेही पावसाचा जोर ओसरणार आहे.
पेरणीसंदर्भात कृषी विभागाचा इशारा
गेल्या आठवड्यात अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतजमिनीत जास्त ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी उत्सुक असले तरी लगेच पेरणी करणे धोकादायक ठरू शकते, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले की, "सध्या जमिनीतील ओलावा आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यामुळे बीज रोपणाची प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. मातीच्या गोळ्यांमुळे बियाणं योग्य प्रकारे उगवणार नाहीत, परिणामी दुबार पेरणीचा धोका निर्माण होईल."
पेरणीयोग्य वापसा स्थितीची वाट पाहा
अधिकाऱ्यांच्या मते, आता हवामान स्थिर होत असून लवकरच पावसात खंड पडेल. त्यानंतर पेरणीयोग्य वापसा स्थिती तयार होईल. त्या स्थितीनंतरच पेरणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीत भरपूर ओलावा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत लगेच पेरणी केल्यास, पावसात खंड पडून आठ-दहा दिवस उघडीप राहिली तर पेरणी वाया जाण्याची शक्यता अधिक आहे, असा गंभीर इशारा कृषी विभागाने दिला आहे.
विशेषतः काळ्या, मध्यम आणि हलक्या प्रकारच्या शेतजमिनीवर पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये, असा सल्ला दिला जात आहे. कारण अशा जमिनीत अतिरिक्त ओलाव्यामुळे माती लवकर गोळे होते आणि बीज रोपण नीट होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे बियाणे उगवले नाही तर दुबार पेरणीशिवाय पर्याय राहत नाही.
मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी; 24 तासांत धुवाधार
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, जिल्ह्यांतील तब्बल 34 महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील 17 महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.मराठवाड्यात 6 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 27 ते 28 मे सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 44 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात 30 मिमी, बीड जिल्ह्यात 26 मिमी, हिंगोली जिल्ह्यात 27 मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 22 मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात 10 मिमी पाऊस झाला.