Nashik News : नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली असून विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई करण्यात येत आहेत. पहिल्या दोन ते तीन कारवायानंतर आज पुन्हा जिल्ह्यातील कारवाईत सुमारे एक कोटीहुन अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


नाषिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार दिंडोरी, सुरगाणा व इतर कारवाईत सुमारे एक कोटी 22 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईनंतर अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 


त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत जानोरी शिवारात फ्रेशस्ट्रॉप कपंनीजवळ शेडमध्ये काही संशयित व्यक्ती डिझेलसदृश्य ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थ भेसळ करीत असल्याचे समजले होते. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकुन संशयित अनिलभाई भवानभाई राधडीया, दिपक सुर्यभान गुंजाळ, इलियास रज्जाक चौधरी, अबरार अली शेख, अझहर इब्रारहुसेन अहमद यांना ताब्यात घेतले. या छाप्यात 2 टॅंकर, प्लॅस्टिक टाक्या, त्यातील बायोडिझेलसदृश्य ज्वलनषील पदार्थ व साहित्य साधने असा एकूण 1 कोटी 01 लाख 68 हजार 240 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईतील संशयित दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान दुसऱ्या कारवाईत सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीत मोतीबाग परिसरात काही संशयित दोन चारचाकी वाहनांमध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून संशयित गणेश रामभाऊ जगताप, दिपक किसन जोरवेकर, सिताराम उर्फ प्रमोद सोमनाथ कोल्हे, प्रशांत शशिकांत आहिरे, सोमनाथ संजय भोये, गोविंद लक्ष्मण महाले यांना ताब्यात घेतले. या संशयिताकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल, 01 जिवंत काडतूस, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड, लाकडी दांडे, मिरचीची पुड असे दरोडा टाकण्याचे साहित्य तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली 1 टाटा नेक्सॉन व 1 महिंद्रा बोलेरो जीप, अशी वाहने जप्त करण्यात आली आहे. संशयित हे सुरगाणा ते उंबरठाण रोडवर मोतीबाग शिवारात रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरीकांना अडवून दरोडा घालण्याचे प्रयत्नात होते. 


तर तिसऱ्या घटनेत भारत व न्युझीलंड संघामध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 क्रिकेट मॅचवर मनमाड षहरात 


काही संशयित सट्टा (बेटींग) लावून जूगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने छापा टाकुन संशयित बंटी उर्फ बलवान सच्चानंद फुलवाणी यास ताब्यात घेण्यात आले. क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्यासाठी वापरलेले मोबाईल स्मार्टफोनसह 23 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


तर नाशिक शहराजवळील ओझर पोलीस ठाणे हद्दीत कसबे सुकेणे गावात काही संशयित हे मोबाईल फोनवर फनरेप नावाचे अॅप वापरून पॉईंट ट्रान्सफर करून 1 रूपयाच्या बदल्यास 36 रूपये अशा दराने रौलेट नावाचा जूगार ऑनलाईन खेळत व खेळवित असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यावरून सदर ठिकाणी छापा टाकून सलीम ताज शेख, गणेश नंदकुमार चौरे, राहुल खाडे, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून 18 हजारव 400 रूपये किंमतीचे मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 


दोन दिवसात कोटींचा माल हस्तगत


नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात दोन दिवस धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत 21 संशयितांविरुद्ध एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1कोटी 22 लाख 78 हजार 395 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आगामी काळात ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.