रत्नागिरी : कोकणातील गणपतीपुळे हे ठिकाण सर्वांनाच ठावूक आहे. बाप्पाचं दर्शन आणि त्यानंतर पर्यटनाचा निखळ आनंद घेण्यासाठी इथं राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. पण, कोरोनामुळे सध्या सारं काही ठप्प असल्यानं इथं असलेला पर्यटकांचा राबता थांबला आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. जिल्हाचा पॉझिटीव्हिटी दर हा 14 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं आणि पर्यटन पूर्णपणे बंद आहे. असं असलं तरी राज्याच्या इतर भागांमध्ये निर्बंध शिथिल झाले आहेत. शिवाय आता जिल्हा प्रवेशासाठी ई पासची देखील गरज लागत नाही. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची कोकणाला आणि पर्यायानं गणपतीपुळे या ठिकाणाला पसंती मिळते. पण, आता गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयामुळे गणपतीपुळे इथं येण्यासाठी पर्यटकांसाठी मर्यादा येणार आहेत.
शिवाय, स्थानिक हॉटेल व्यवसायिकांची देखीस याबाबत नाराजी आणि संमिश्र अशी प्रतिक्रिया दिसून येत आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना खोली भाड्यानं दिल्यास हॉटेल किंवा लॉज मालकाला दहा हजार किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय इथल्या ग्रामपंचायतीनं घेतला आहे. गावच्या सरपंच कल्पना पकले यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांना खोली भाड्यानं मिळताना काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
काय आहे सरपंचांचं म्हणणं?
सध्या जिल्हात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. पण, गणपतीपुळे इथं मात्र कोरोनाचा एकही रूग्ण नाही. गणपतीपुळे येथे पर्यटक येतात. पण, आल्यानंतर मात्र त्यांच्याकडून कोरोना काळातील कोणत्याही नियमांचं पालन होत नाही. पर्यटक बिनधास्तपणे बाजारपेठा आणि समुद्रकिनाऱ्यासह मंदिर परिसरात फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढते. हा सारा विचार करता आम्ही सदर निर्णय घेतल्याचं सरपंच कल्पना पकले यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे. गावचे उपसरपंच महेश केदार यांनी 'पर्यटक येण्याला आमचा विरोध नाही. पण, पंचक्रोशीचा विचार करता गावात एकही कोरोनाचा रूग्ण नाही. त्यात त्यांच्याकडे नियमांचं पालन होत नाही. शिवाय, शासनाकडून देखील पर्यटन बंद आहे. अशावेळी नियमांना बगल देणे योग्य नाही. गावात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये हाच आमचा हेतू आहे. याबाबत आम्ही प्रांत किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी देखील बोलणार आहेत.' अशी प्रतिक्रिया दिली.
व्यवसायिकांचं म्हणणं काय?
ग्रामपंचायतीच्या निर्णयावर बोलताना काही हॉटेल मालक आणि व्यवसायिक यांनी आपली नाराजी व्यक्त करत काहीतरी तोडगा काढावा असं म्हटलं आहे. मागील वर्षभरापासून हॉटेल व्यवसाय पर्यटन पूर्णपणे बंद आहे. अशा वेळी अशा प्रकारे नियम न करता यातून मध्यम मार्ग निघावा अशी प्रतिक्रिया अजित रानडे आणि संदिप कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तर, पर्यटकांनी देखील येताना साऱ्या स्थितीचा अंदाज घ्यावा. कारण मंदिर देखील बंद असल्याची प्रतिक्रिया प्रशांत नलावडे यांनी दिली आहे.
काय आहे पर्यटनाची स्थिती?
जिल्ह्यात पर्यटन सध्या पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. अशी स्थिती असताना जिल्ह्यात किंवा गणपतीपुळे येथे पर्यटकांची संख्या नगण्य आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारे किंवा पर्यटन स्थळं तुलनेनं शांत आणि निर्मनुष्य आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची स्थिती काय?
जिल्ह्यात जून महिन्यामध्ये 16 हजार 692 जणांना कोरोनाची लागण झाली असून महिनाभरात पाचशेपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्याच्या पॉझिटीव्हीटी रेट हा 14.41 टक्के असून डेथ रेट 2.86 टक्के आहे. सध्या जिल्ह्यात 6241 केस अॅक्टिव्ह आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 62,100 जणांना कोरोनाची लागण झाली असून 54,081 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1778 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 87.24 टक्के असून 3 लाख 75 हजार 970 स्वॅब आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये नऊ रूग्ण हे डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आले होते. पैकी एका 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता.तर उर्वरित 8 जण यावर मात करत घरी गेले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. सध्या जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही अॅक्टिव्ह रूग्ण नाही आहे. पण, खबरदारीचा उपाय म्हणून 117 स्वॅब दिल्लीला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.