नांदेड : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन महिने उलटले तरीही भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत आशावादी असल्याचं चित्र आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.


सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच मनसेला सोबत घेण्याची गरज नसल्याचंही मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेवर खोचक टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. "मुंबईच्या शक्तिशाली मातोश्रीचा शक्तिपात झाल्यानेच दिल्लीच्या मातोश्री शक्तिशाली झाली. शिवाय शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा म्हणजे एकविसाव्या शतकातील आश्चर्य आहे, असंही ते म्हणाले.

शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास सत्ता स्थापनेसाठी अडचण नाही
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए ,सुबह का भुला श्याम को आया, असं आम्ही समजू." तसंच मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही आणि तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी सरकारची परिस्थिती
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवरही टीका केला. "व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी या सरकारची परिस्थिती आहे. सरकार किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. भिन्न विचाराचं सरकार दीर्घकाळ टिकत नसल्याचा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. त्यामुळे काय होईल हे सांगता येणार नाही," असं मुनगंटीवार म्हणाले.