"जर नाणार रद्द झाला, तर निवडणूक लढवण्याशिवाय मला पर्याय उरणार नाही. मी जनतेसमोर जाण्यास तयार आहे, मी घाबरणारा नाही. पण युतीच्या शिल्पकारांनी ती वेळ आणून देऊ नये," असा इशारा प्रमोद जठार यांनी दिला.
प्रमोद जठार म्हणाले की, "हे बंड नाही, कोकणातील बेरोजगारांची किंकाळी आहे. ती युतीच्या दोन्ही नेत्यांपर्यंत पोहोचावी ही माझी विनंती आहे. कोणीतरी राजकारणासाठी हा प्रकल्प नाकारणं हे पटत नाही. शिवसेनेला नको, राणेंना नको म्हणून प्रकल्प रद्द करायचा का? प्रकल्प का नाकारता याचं कारण द्या. कारण या प्रकल्पामुळे कोकणातील दीड लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. शास्त्रीय कारण, जनमत चाचणीच्या आधारे प्रकल्प नाकारा." "प्रकल्प रोह्यात चालतो, सिंधुदुर्ग-रत्नागिरीत का नाही? असा सवालही त्यांनी विचारला.
नाणार प्रकल्पाबाबत जनमत कौल घ्यावा तसंच प्रकल्प रद्द होऊ नये यासाठी भाजप आमदार, माजी आमदार, मंत्री तसंच प्रकल्प समर्थक सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याचं प्रमोद जठार यांनी सांगितलं.