जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा असतानाच आता पुन्हा एकदा खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेली 40 ते 42 वर्षे मी पक्षाासाठी काम करत आहे. पण गेल्या काही दिवसात माझ्यावर अन्याय होत आहे. मला टार्गेट केले जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शेवटी मी माणूस आहे, देव नाही, मलाही भावना आहेत. जर माझ्यावर असाच अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

खडसे म्हणाले, अनेक वर्षे मी पक्षाशी एकनिष्ठेने काम करत आहे. मला पक्षाने खूप काही दिलं आहे. पण आता मला जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे. मी काहीही केलेले नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले आहे. आता तर निर्णय प्रक्रियेतूनही मला काढून टाकण्यात आले आहे. मला कोअर कमिटीतही स्थान नाही. आजही मला फक्त जळगावच्या बैठकीचे निमंत्रण होते, हा माझा अपमान आहे.

भाजपच्या नेत्यांनी रोहीणी खडसे आणि पंकजा मुंडेंचा पराभव केला असेल तर एकनाथ खडसेंनी त्याचे पुरावे द्यावं असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं होतं. आणि ते आव्हान स्वीकारत एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे देण्याची तयारी दर्शवली. खडसे म्हणाले, मला पुरावे दाखवण्याची परवानगी पक्षश्रेष्ठींनी द्यावी. मी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. पाटील म्हणाले हा पक्षांतर्गत विषय आहे. अमित शहा, नड्डा. भुपेंद्र यादव यांच्या समवेत चर्चा करून त्यांना पुरावे दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पक्षातील ज्या लोकांनी पक्षविरोधी काम केले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. प्रदेशाध्यक्षांना मी कागदोपत्री पुरावे दिले आहे. ते समाधनी आहे. पक्षा विरुद्ध काम करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल अशी माझी अपेक्षा आहे.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडून ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्याचा प्रयत्न होत असून नाराज आपोआप एकत्र येतात, असा आक्रमक सूर खडसे यांनी लावला होता. याविषयी बोलताना खडसे म्हणाले, बहुजन समाज आणि ओबीसी समाजावर अन्याय होत आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षापर्यंत पोहचवण्याचं काम मी केल आहे. भाजपचा चेहरा बदलवण्याचे काम अनेक नेत्यांनी केल आहे. पक्षवाढीत ओबीसी नेत्यांचा मोठा वाटा आहे.

मी पक्ष सोडणार नाही अस खडसे यांनी स्पष्ट केल आहे. पक्ष सोडण्याचा विचारही मनातही येत नाही, असे देखील खडसे म्हणाले.