परभणी :  त्रिपुरा कॅडर 2015 च्या आयएएस बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनाने पुणे येथे उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. मात्र त्यांना नांदेड येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे जसे पाहिजे तसे उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे आम्हालाही मोठी शिक्षा भोगावी लागली असल्याचा गंभीर आरोप सुधाकर शिंदे यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी केला आहे. यामुळे परत एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.



35 वर्षीय आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे हे सुट्टीनिमित्त गावी आले होते. पालम तालुक्यातील उमरा येथील गावी ते शेतातील विहिरीत पोहण्यास गेले आणि त्यानंतर त्यांना सर्दी आणि ताप येत होती. यामुळे त्यांनी पालम येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवल्यानंतर नांदेड येथील गुरुगोविंद सिंग सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. या ठिकाणी त्यांना उपचार जसे पाहिजे होते तसे मिळाले नसल्याचा आरोप त्यांच्या बंधूंनी केला आहे.

चार दिवसांमध्ये तीन टेस्ट केल्या त्या तिन्ही निगेटिव्ह आल्या. मात्र तरीही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शेवटी परिवाराने त्यांना औरंगाबाद येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे कुटुंबातून आरोग्य व्यवस्थेवरील रोष व्यक्त केला जातोय. शिवाय गावकऱ्यांनी ही कोरोनाचे रुग्ण किंवा इतर रुग्ण हे परभणीत राहून व्यवस्थित नीट होत आहेत. मात्र नांदेडच्या एवढ्या मोठ्या रुग्णालयात जाऊन देखील त्या ठिकाणी का बरे झाले नाहीत असा सवाल केला आहे.


सुधाकर शिंदे सुट्टी असल्याने दोन आठवड्यांपूर्वी कुटुंबीयांसह गावी आले होते.परभणीच्या पालम तालुक्यातील उमरा गावात त्यांचे वडील चार भाऊ राहतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना नांदेड येथील गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तब्येत खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. औरंगाबादवरून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकला त्यांना हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

सुधाकर शिंदे हे त्रिपुरा येथे अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. सन 2015 च्या बॅचमध्ये त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांचं शालेय शिक्षण परभणी येथील नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर औरंगाबाद येथून महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून ते पुणे व नंतर दिल्ली येथे युपीएससी परीक्षा देण्यासाठी गेले आणि 2015 साली आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात वडील चार भाऊ तीन बहिणी पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा मोठा परिवार आहे.