UPSC Success Story: हिंदीमध्ये एक म्हण आहे  'मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है' अर्थात ज्यांच्या स्वप्नांमध्ये ताकत असते ते जिद्दीनं यश खेचून आणतातच. अशीच कहाणी आहे पालघरमधल्या भोईसरच्या वरुण बरनवालची.  आयएएस अधिकारी वरुण बरनवाल (IAS Varun baranwal)यांच्यावर या ओळी अगदीच शोभून दिसतात.  वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वरुणनं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्याच जिद्दीनं UPSCसारखी अवघड परीक्षा पास करत आयएएस अधिकारी झाला.  


महाराष्ट्रातील भोईसरमधील हा तरुण.  वरुणने विद्यार्थी जीवनापासून ते आयएएस प्रवासापर्यंत अनेक आव्हानांचे डोंगर पार केले. मात्र त्याची जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर त्याने आपल्या ध्येयाला गाठलंच. 


वरुण अगदी लहान असतानाच वडिलांचं निधन झालं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वरुणवर आली. तो अभ्यासात प्रचंड हुशार होता. मात्र घरच्या जबाबदारीमुळं त्यानं वडिलांचं सायकल दुरुस्त करण्याचे काम हाती घेतलं अन् सायकल पंक्चरचं दुकान चालवू लागला. काम करत करत त्यानं  दहावीच्या परीक्षेत शहरात दुसरा क्रमांक पटकावला. मात्र त्यानंतरही त्याला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं
 
मात्र म्हणतात ना आपला उद्देश प्रामाणिक असेल आणि ध्येय गाठण्यावर आपण ठाम असाल तर आपल्याला रस्ता मिळतोच. अगदी तसंच वरुणच्या बाबतीत देखील झालं. त्याला त्याच्या ओळखीतल्या एका डॉक्टरांनी पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा सल्ला दिला आणि वरुणलाही कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. बारावी केल्यानंतर वरुणने इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना फी भरण्यात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अभ्यास करत करत त्यानं सायकलचं दुकानही सुरुच ठेवलं शिवाय ट्यूशन्सदेखील घ्यायचा.  


वरुणच्या जिद्द आणि मेहनतीचे फळ म्हणजे तो पहिल्या सेमेस्टरला तो पहिला आला. त्यामुळं त्याला महाविद्यालयात शिष्यवृत्ती देण्यात आली. इंजिनीअरिंग केल्यानंतर वरुणने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.  वरुणने 8 वर्षांच्या मेहनतीनंतर नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण देशात 32 वा क्रमांक पटकावला. कठोर परिश्रम आणि धैर्याने वरुण बरनवाल आयएएस अधिकारी झाला. 


सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग घेणाऱ्या वरुणनं मिळवलेलं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. सध्या वरुण हे गुजरात कॅडरमध्ये कार्यरत आहेत. 


ही बातमी देखील वाचा


आईला वाटायचं पोरगं बीडीओ व्हावं; पठ्ठ्या आधी IPS अन् नंतर IAS झाला! क्रिकेटवेड्या सातारकर पोराची भन्नाट गोष्ट


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI