मुंबईः जलसंधारण खातं काढल्यानं कसलीही नाराजी नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं हे माझ्या रक्तातच आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सिंगापूर दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


 

 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंकडून जलसंधारण हे महत्वाचं खातं काढून घेतलं आहे. त्यामुळे पंकजांनी आपली नाराजी ट्विटरद्वारे जाहिरपणे सांगितली होती. पंकजांच्या रॉयलस्टोन येथील निवासस्थानी आज कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

बोलताना मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

पंकजा मुंडे सिंगापूर दौऱ्यावरुन परतल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. जलसंधारण खात्याची मंत्री म्हणून काम करताना या खात्याची उंची वाढेल असं काम केलं. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वी केली. जनतेची पुण्याई माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे कुठूनही उडी मारली तरी जनता मला झेलणार याचा मला विश्वास आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

 

 

राजकारणात आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. कोणाविरूध्द षडयंत्र रचलं नाही. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण मला असल्याने मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम करीन, असं सांगत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला.

 

 

सध्या आपल्याकडे असलेल्या खात्यांमधूनही चांगले करून ते खातं लोकप्रिय करून दाखवू. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं.