Walmik Karad : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडचा कारनामा दिवसागणिक समोर येतच आहे. वाल्मीक कराडच्या कारनाम्याची भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून दररोज चिरफाड सुरु असतानाच आता आणखी एक कारनामा खंडणी प्रकरणातील समोर आला आहे.
तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन
दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी वाल्मीक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचे समोर आलं आहे. ही धमकी वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दिली होती. या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदु शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे. आता हे रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागलं आहे त्यामुळे त्याची तपासणी केली जात आहे. दोन कोटीच्या खंडणीसाठी वाल्मीक कराडने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता. हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता. त्यावेळी विष्णूने वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले होते. यावेळी बोलताना वाल्मीक कराडने सुदर्शनने सांगितलं आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुद्धा कार्यालयामध्ये पोहोचला होता.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पुण्यात 100 कोटींची संपत्ती
दुसरीकडे, छोट्या आकाला 2022 मध्येच ईडीची नोटीस आली होती. वाॅचमनच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. सुशील पाटील बिल्डर पुण्यात असून एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या बाजूला सात शॉप आका काढत आहे. त्या एका शॉपची किंमत पाच कोटी आहे. विष्णू चाटेची बहीण, आकाची दुसरी पत्नी आणि वाल्मिक आकाच्या नावावर शॉप आहे. हे 40 कोटींचे शॉप आहे. त्या बिल्डरची भेट घेऊन आलो, विचारलं आमच्या आकाला काय काय दिले? आकाने 35 कोटींचे टेरिस मागितले होते. मगरपट्टा येथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी आहे आणि हा फ्लॅट कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे, ज्याची किंमत 75 कोटी आहे. ड्राव्हरकडून आकाने राहण्यासाठी करार देखील करून ठेवले, असा सनसनाटी दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पुण्यात 100 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही सुरेश धस यांनी केला आहे.