वसई : राज्यातील घाणेरड्या राजकारणामुळे आपल्याला राजीनामा द्यावा लागला, असं माजी वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. संजय राठोड आज वसईत कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यावेळी तेथे ते बोलत होते. अतिशय गरीब परिस्थितीतून मी राजकारणात आलो, मंत्री पदापर्यंत पोहचलो. पण राज्याच्या घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, हे खूप दुर्दैवी आहे. पण अशा संकट काळात संपूर्ण महाराष्ट्रातील माझा समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्यातून मला पुन्हा लढण्याची जिद्द मिळाली आहे. त्यामुळे मंत्री असताना माझा समाज मला भेटत होता. आता मी समाजाच्या दारादारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे, असं माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी सांगितलं. 


वन मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी समाज बांधणीसाठी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील वसई येथून केली. वसईच्या देवीपाडा तांड्यावर जाऊन त्यांनी समाजाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार होते. 


यावेळी संजय राठोड यांनी सांगितले की, वसईला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि क्रांतिकारी इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतील समाज या परिसरात वसलेला आहे. वसई हे मुंबई जवळचे ठिकाण आहे. त्यासाठी मी वसई हे माझ्या दौऱ्याचे पाहिले ठिकाण निवडले. कोरोनाचा संकट काळ चालू आहे, आमचा बंजारा समाजाचा नागरिक हा वीटभट्टी, मोलमजुरीचे काम करणारा आहे. अशा काळात त्यांना मदत आणि धीर देण्याची गरज आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोना महामारीत माझा बंजारा समाजाच्या वेदना, समस्या समजून घेणे, त्यांच्या प्रत्येक संकटात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे, असंही माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.


इतर बातम्या


नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख


दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री, अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर