उस्मानाबाद : मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेच्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी एक्स्लुझिव्ह बातचीत केली.
गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.
मात्र मी माझा कट्टा पाहिला नाही. त्यामुळे त्याविषयी बोलणार नाही. परंतु मी फक्त माझी जन्मतारीख लक्षात ठेवते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपला पाठिंबा नाहीच
शिवसेनेचे मंत्री राजीनामा 18 फेब्रुवारी रोजी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार अस्थिर होईल. त्यामुळे सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का याबाबत प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळेंनी आमचा भाजपला पाठिंबा नसल्याचं सांगितलं.
शरद पवार दोन वर्षांपूर्वी पाठिंबा देण्याचं बोलले होते. त्यानंतर एकदाही बोलले नाहीत. आम्ही कोणाबरोबरही जाणार नसल्याचं पवार काही दिवसांपूर्वी बोलले होते, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
फालतू विचार करण्यासाठी वेळ नाही
सरकारच्या विरोधात कोणते मुद्दे असल्याचं तुम्हाला वाटतं, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी याबाबत फारसा विचार केलेला नाही. फालतू विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो. मी लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहे."
फडणवीस सरकारचा कारभार घाणेरडा
अडीच वर्षातील फडणवीस सरकारचा सर्वात घाणेरडा कारभार असल्याचा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी केला. सत्ता स्थापनेपासूनच हे घाणेरडं सरकार आहे. महाराष्ट्राचा नंबर वन घसरला.
सत्तेतील दोन पक्षात मोठं भांडण सुरु आहे. 25 वर्ष युतीमध्ये होते. 25 वर्षांनंतर दोनच वर्ष सत्तेत आले. सत्तेत सोबत असूनही भांडण एवढं टोकाला पोहोचलं आहे की, ते एकमेकांचं पाणी काढत आहेत. ही मराठी संस्कृती नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
पवारांना विरोध ही खेकडा प्रवृत्ती
शरद पवारांना पद्मविभूषण हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. पवारांनी हा पुरस्कार राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. पण शरद पवारांना विरोध ही खेकडा प्रवृती आहे. महाराष्ट्रातील काही जणांना पवारांना विरोध करण्याची सवय आहे, असंही सुळे म्हणाल्या.