रावतेंना बैठकीसाठी मी स्वत: दोनवेळा फोन केला : चंद्रकांत पाटील
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2017 02:29 PM (IST)
कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी नेमलेल्या मंत्रिगटाची बैठक रविवारी दुपारी 1 वाजता मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी आपण स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी बोललो असल्याची माहिती महसूलमंत्री आणि उच्चाधिकार मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसंच शेतकऱी आंदोलकांच्या 90 टक्के मागण्या आधीच सरकारनं मान्य केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. उद्या रविवारी उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीसाठी आपल्याला बोलावणं नसल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितल्यानंतर त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. "मी स्वत: दिवाकर रावतेंशी बैठकीबद्दल बोललो आहे" असं म्हणत दिवाकर रावतेंचा आरोप त्यांनी खोडून काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधार ठेवल्याचं रावते म्हणाले.