मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी "मी शिवसेनेत आले आहे. परंतु मी युतीच्या प्रचारसभांमध्ये किंवा रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घोषणा दिल्या नाहीत", असे म्हटले आहे.

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. परंतु आता काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर चतुर्वेदी भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत आल्या आहेत. अनेक मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपची विचारधारा सारखीच असल्यामुळे ज्या भाजपच्या विचारधारेवर चतुर्वेदी यांनी सातत्याने टीका केली होती, त्याच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चतुर्वेदींना पंतप्रधान मोदींविषयी आणि भारतीय जनता पक्षाविषयीची त्यांची मतं विचारली जात आहेत.

मोदी आणि भाजपविषयी विचारल्यानंतर चतुर्वेदी म्हणाल्या की, मी शिवसैनिक आहे आणि उद्धव ठाकरे माझे नेते आहेत. मी मुंबईचा, महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील शिवसेनेच्या उमेदवारांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांच विचार करते. शिवसेना आणि भाजप दोघांची युती असली तरी मी केवळ शिवसेनेच्या उमेदवारांचाच प्रचार करत आहे. मी मोदी किंवा भाजपचा प्रचार करत नाही. मी मोदींसाठी, भाजपसाठी घोषणा दिल्या नाही आणि देत नाही. मी माझ्या पक्षासाठी घोषणा देते.

चतुरर्वेदी यांनी यावेळी सांगितले की, शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी शिवसनेने स्वतःच्या अटींवर युती केली आहे.

वाचा : ...म्हणून काँग्रेस सोडल्यानंतर शिवसेनेची निवड केली : प्रियांका चतुर्वेदी