मी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही : अशोक चव्हाण
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2019 07:42 PM (IST)
काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या कालपासून मुलाखती सुरु आहेत. आमदार सुभाष झाम्बड हे या मुलाखतींसाठी पक्ष निरीक्षक म्हणून व्यासपीठावर हजर होते.
नांदेड : काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या कालपासून मुलाखती सुरु आहेत. आमदार सुभाष झाम्बड हे या मुलाखतींसाठी पक्ष निरीक्षक म्हणून व्यासपीठावर हजर होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील मुलाखतींच्या दोन्ही दिवशी व्यासपीठावर उपस्थित होते. आज अशोक चव्हाण यांच्या पारंपरिक भोकर मतदार संघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम होता, परंतु अशोक चव्हाण यांनी मात्र मुलाखत दिली नाही. मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, त्यांनी निवडणूक लढवण्यासाठीची पक्षाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच त्यांनी स्वतः पक्षाकडे उमेदवारी मागितलीदेखील नाही. परंतु पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढवेन हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. नांदेड मतदारसंघ हा अशोक चव्हाणांचा गड म्हणून ओळखला जातो पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांना या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे भोकर मतदारसंघात चव्हाणांना मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा लढवण्यास इच्छुक नसणारे अशोक चव्हाण आगामी निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चांना उत आला आहे. अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण या भोकर विधानसभेच्या आमदार आहेत.