औरंगाबाद : पती संशय घेतो म्हणून पत्नीने सुपारी देऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पती जितेंद्र होळकर यांच्या हत्येप्रकरणी पत्नी भाग्यश्री होळकरसह चौघांना अटक करण्यात आली आहे.


औरंगाबादमध्ये सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याचा घरात घुसून खून केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या हत्येचा शोध दोन दिवसांच्या आतच लावला. भाग्यश्री होळकर जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी आहे.

भाग्यश्री होळकरने पतीला मारण्यासाठी किरण गणोरे, फैय्याज आणि बाबू यांना 2 लाखांत सुपारी दिली होती. किरण गणोरेने सुपारी देण्यासाठी मध्यस्थी केली, तर फैय्याज आणि बाबू यांनी जितेंद्र होळकर यांचा खून केला. मध्यस्थ करणारा किरण गणोरे हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे.

जितेंद्र होळकर हे 15 वर्षीय मुलगा आणि पत्नीसह राहत होते. होळकर कुटुंबीय शुक्रवारी जेवण करुन रात्री 11 वाजता झोपलं होतं. हत्या झाली तेव्हा जितेंद्र होळकर घरातील एका खोलीत तर पत्नी आणि मुलगा दुसऱ्या खोलीत झोपले होते.

मात्र रात्री अडीचच्या सुमारास जितेंद्र होळकर यांच्या खोलीतून आवाज आल्यानंतर त्यांच्या पत्नी तिथे गेल्या असता, होळकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यानंतर त्यांनी फोन करुन शेजाऱ्यांना सांगितलं. मात्र पत्नी भाग्यश्रीनेच पतीचा काटा काढल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

संबंधित बातमी : औरंगाबादमध्ये बँक मॅनेजरची घरात घुसून हत्या