Dhule News Update : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील डांगरशिरवाडे येथे ही घटना घडली आहे. दिलीप हिराजी सोनवणे ( वय 48 )  असे संशयीत आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला त्याब्यात घेतले आहे. 


डांगरशिरवाडे येथे दिलीप सोनवणे हा पत्नी मंडाबाई सोनवणे आणि मुला-मुलींसह राहत होता. तो पत्नी मंडाबाई यांच्या चारित्र्यावर नेहमी  संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत असत. त्यांच्यातील ही भांडणे नित्याची झाली होती. दिलीप याने गावातीलच एक शेत कसायला घेतले आहे. बुधवारी रात्री तो पत्नी मंडाबाईला घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेतातच त्यांच्यात वाद सुरू झाला. यामुळे संतप्त झालेल्या दिलीप याने शेताच्या बांधावर पत्नी मंडाबाईच्या डोक्यावर तसेच तोंडावर दगडाने मारहाण केली. या घटनेत पत्नी मंडाबाईचा जागीच मृत्यू झाला. 


 या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी मृत मंडाबाई यांचा मृतदेह दुपारी उशिरा पिंपळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.


याप्रकरणी पिंटू काळू गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिराजी सोनवणे याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात पत्नीचा खून केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलीप सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कारवाई सुरू होती. दरम्या, या घटनेने साक्री तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या