पाच दिवसांचा संसार, पत्नीला वाचवताना पतीचाही आगीत मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2017 12:07 PM (IST)
शिर्डी : शिर्डीमधील एका नवदाम्पत्याचा संसार अवघे पाच दिवसांचा ठरला आहे. नवविवाहितेला आगीतून वाचवताना पतीचाही होरपळून मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील दाढ येथील घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. काजोल आणि प्रशांत वाघमारे यांचा 5 फेब्रुवारी 2017 रोजी विवाह झाला होता. शुक्रवारी राहत्या घरी लागलेल्या आगीत काजोल अडकली. त्यावेळी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पतीने धाव घेतली. मात्र नव्याने फुलणारा संसार अकालीच कोमेजला. काजोलचा आगीत जागीच मृत्यू झाला, तर पती आगीत होरपळून गंभीर जखमी झालेल्या प्रशांतचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोणी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.