मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत 1 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 'वन टाइम सेटलमेंट'ची मुदतही सरकारनं आधीच ३० जूनपर्यंत वाढवली आहे.

यापूर्वी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देण्यात आली होती. पण आता ही मुदत १ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

http://csmssy.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. कर्जमाफीच्या अर्जासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. अर्ज भरताना शेतकऱ्यांना आधार नंबरच्या साहाय्याने बायोमेट्रिक पद्धतीने किंवा वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून आपलं प्रमाणीकरण करावं लागणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक, जिल्हा बँक किंवा सबंधित राष्ट्रीयकृत बँक यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.

अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी https://csmfs.mahaonline.gov.in/PDF/CSMFS_User_Manual.pdf  या लिंकला भेट द्या.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत 14,388 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप केलं आहे. यात 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा दावाही सरकारने केला. मात्र माहिती अधिकारात जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शेतकरी कर्जवाटपाबाबत पारदर्शी असलेल्या सरकारच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.