औरंगाबाद : घेणं ना देणं आणि दिसेना डोळ्यानं अशी काहीशी अवस्था औरंगाबादच्या नेत्या-कार्यकर्त्यांची झाली आहे. औरंगाबादजवळील एका कार्यक्रमानंतर आमदार प्रशांत बंब, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडेंसह काही नेते, कार्यकर्त्यांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागले आहेत.
 


रविवारी संध्याकाळी औरंगाबादजवळच्या झालटा गावात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. विषय होता जलयुक्त शिवाराच्या उद्घाटनाचा. नेते-कार्यकर्ते असा शे-दोनशे जणांचा लवाजमा होता. मात्र या कार्यक्रमानंतर अनेकांच्या डोळ्यांना त्रास सुरु झाला.

 

डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि डोळेही सुजल्याचं लक्षात आलं. आमदार प्रशांत बंब, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योजक राम भोगलेंसह काही नेते, कार्यकर्त्यांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागले आहेत. त्यामुळे आज औरंगाबादचे सगळे नेत्रतज्ज्ञ सकाळपासून बिझी होते.

 
डोळ्यांच्या त्रासाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसलं, तरी वायूप्रदुषणामुळे ही बाधा झाल्याचा अंदाज लावला जात आहे.