उस्मानाबाद : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागातर्फे तयार करण्यात आलेला साडेपाच कोटींचा रस्ता अवघ्या शंभर दिवसात खचला आहे. सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून उस्मानाबादहून आंबेहोळ वलगुड या गावाकडे जाणारा 10 किलोमीटरचा रस्ता शंभर दिवसापूर्वीच बनवला आहे. पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता एका पावसातच खड्डेमय झाला आहे.
गावातील अनेक ग्रामस्थांनी रस्ता खचल्याची बाब शासनाच्या लक्षात आणून दिली, पण सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालत असून गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
गावकऱ्यांचा रेटा वाढतोय, हे लक्षात आल्यानंतर ऐन पावसाळ्यात रोडचे पॅचवर्क सुरु करण्यात आले. परंतु पावसाळ्यात केले जाणारे पॅचवर्क कितपत टिकणार? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या रोडवरचे पॅचवर्क काम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे कंत्राटदाराला हे काम बंद करावे लागले आहे. ऐन सुट्टीच्या काळात सरकारी बाबूंच्या उपस्थितीत हे काम सुरु केल्याने गावकर्यांचा विरोध होऊ लागला, त्यामुळे हे काम तूर्तास तरी बंद करण्यात आले आहे.