इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेची सांगलीतील शेवटची सभा इस्लामपुरात पार पडली. माजी मंत्री जयंत पाटील यांचं होमग्राऊंड असलेल्या इस्लामपुरात कार्यकर्त्यांच्या अफाट गर्दीत राष्ट्रवादीची सभा पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या तुफान फटकेबाजीने सभा गाजली. या सभेदरम्यानचा मोबाईल बॅटरीच्या उजेडाचा प्रसंगही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्या धडाकेबाज भाषण शैलीमुळे विरोधकांमध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या धनंजय मुंडे हे ज्यावेळी व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिले, त्यावेळी समोरील गर्दीतून धनंजय मुंडेंच्या नावाने घोषणा सुरु झाल्या.



सभेला उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून धनंजय मुंडे यांनी सुरुवातीलाच कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “या आंधळ्या सरकारला उजेड दाखवण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचा उजेड दाखवा.”. त्यानंतर समोरील कार्यकर्त्यांनी आपापले मोबाईल काढत बॅटरी चालू केली आणि अवघं मैदान प्रकाशमय करुन टाकलं. यावेळचं दृश्य पाहण्याजोगं होतं.



तटकरेंकडूनही धनंजय मुंडेंच्या भाषणाला दाद

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या भाषणाला दिलखुलासपणे दाद दिली. तटकरे म्हणाले, “युवराज  सिंग ज्या पद्धतीने 6 चेंडूवर 6 षटकार ठोकतो, त्याप्रमाणे धनंजय मुंडेंचे भाषण झाले.”

राष्ट्रवादीच्या इस्लामपुरातील सभेचा व्हिडीओ :