मुंबई : आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण 1 लाख दहा हजार डॉक्टर्स सहभागी होतील. सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र तातडीने सेवा सुरु राहतील. यात आय.सी.यु., अपघातात सापडलेल्या रुग्णासाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा सुरु राहतील.
इंडियन मेडिकल असोसिएशनने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात बंद विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे . यामध्ये त्यांनी या आंदोलनात मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क (एम.एस.एन.) या आय.एम.ए.च्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील 36 सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 15,000 वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित इस्पितळात पदव्युत्तर शिक्षण घेणारे 15000 ज्युनिअर डॉक्टर्स महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (मार्ड) आणि आय.एम.ए.च्या ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क (जेडीएन) तर्फे सक्रीय सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या 34 संस्थांनी सक्रीय पाठिंबा दिलेला आहे.
यात फेडरेशन ऑफ गायनेकोलॉजी (फॉगसी), महाराष्ट्र सर्जिकल सोसायटी, फिजिशियन्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन असोसिएशन ऑफ पेडीयाट्रिशियन्स, इंडियन डेंटल असोसिएशन, असोसियेशन ऑफ कोलोरेक्टल सर्जन्स, इंडियन रेडीओलॉजीकल अँड इमेजिंग असोसियेशन, फेडरेशन ऑफ फॅमिली फिजिशियन्स ऑफ इंडिया (एफ.एफ.पी.ए.आय.), जीपीए- मुंबई, अशा अनेक संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतभरातील 6 लाख आयएमए सदस्य त्यात सक्रिय सहभाग घेतील. महाराष्ट्रातील 1, 50, 000 डॉक्टर्स आणि पदवीपूर्व तसेच पदवीपूर्व विद्यार्थी त्यात सहभागी होतील.
याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, "आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 एलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. आयएमएने या विरोधात 11 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. आयएमएचा हा लढा आयुर्वेदाविरोधी नाही. किंवा आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधीसुद्धा नाही. आमचा विरोध वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणाऱ्या 'मिक्सोपथी' विरोधी आहे. या बंदमध्ये रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर्व तातडीने सेवा सुरु राहणार आहेत, मात्र सरकार ज्यापद्धतीने दोन पॅथींची सरमिसळ करत आहे त्याच्या विरोधात हा आमचा बंद आहे.
WEB EXCLUSIVE | कोरोना लसीकरणासंदर्भात सर्व तयारी पूर्ण : मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल