रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांनी आज सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी केली. यावेळी कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, ऊर्जा मंत्री नितिन राउत, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई, आदी लोक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प
कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडवले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून 1920 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो. हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात 300 मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातुन लेक टॅपिंग पध्द्तीने 1000 MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.
जलविद्युत केंद्राच्या पाहणीवेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्रयांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.