साताऱ्यात शिलोबा डोंगरावरील यात्रेत भाविकांवर मधमाशांचा हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2017 02:28 PM (IST)
सातारा : साताऱ्यातील शिलोबा डोंगरावर सुरु असलेल्या यात्रेवेळी मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात 50 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील शिरोबा डोंगरावर आज यात्रा होती. या यात्रेला या डोंगराच्या आजुबाजुच्या गावातील शेकडो लोक मोठ्या संख्येने दाखल हजेरी लावतात. मात्र जास्त उन्हामुळे आज दुपारी डोंगरावर कमी भाविक होते. जमलेल्या भाविकांनी देवासमोर उदबत्या लावल्या होत्या. उदबत्यांच्या धुरामुळे डोंगराच्या एका कपारीत असलेल्या आग्या मधमाशा पिसळल्या आणि मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. या मधमाशांच्या हल्यात 50 हून अधिक भाविक जखमी झाले. यातील 35 भाविकांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. डोंगरावरुन पळत खाली येताना काहीजण पडल्यामुळे भाविक जखमी झाले आहेत.