Maharashtra Politics नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Election 2024) साऱ्यांना वेध लागले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवर राजकीय घडामोडींना आता वेग आले आहे. सध्या जरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी त्यासाठीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष सर्वच मतदारसंघात मोर्चे बांधणीसाठी सज्ज झाला आहे. अशातच आता अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. असाच काहीसा प्रकार राज्याच्या उपराजधानी नागपुरात (Nagpur News) देखील बघायला मिळाला आहे.
भाजपचे'देवा भाऊ' नावाचे होर्डिंग नागपुरात ठरले लक्षवेधी
राज्यात विधानसभेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही. मात्र नागपुरात भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. "देवा भाऊ" या टॅगलाईनचे भाजपचे होर्डिंग नागपुरात लक्षवेधी ठरत आहेत. शहरातील प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आकाराचे हे होर्डींग देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून नागपूर शहरासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करणारे असून ते नागपूर शहर भाजपने लावले आहे. गेल्या दहा वर्षात नागपुरात झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख या होर्डिंग च्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. परिणामी या होर्डिंगची चांगलीच चर्चा सध्या नागपूरच्या राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे.
भाजप पाठोपाठ काँग्रेस पक्षानेही उपराजधानीत कंबर कसली
नागपूर शहरात भाजप पाठोपाठ काँग्रेस पक्षानेही जोरदार तयारी केली आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. परिणामी, महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)कडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची नागपूर विधानसभा आढावा बैठक रविवारी सायंकाळी गंजीपेठ येथील रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते. तर दुसरीकडे जागावाटपाचा निर्णय अद्याप व्हायचा असला तरी नागपुरात काँग्रेसने आपला प्रचार सुरू केला आहे.
नागपूरातील सहाही जागांवर काँग्रेस दावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार पूर्व नागपूर मतदारसंघात इच्छूक संगीता तलमले यांनी प्रचार सुरु केला आहे. नाना पटोले, रमेश चेनिथला यांच्या उपस्थितीत कालंच नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारीबाबत बैठक झाली होती. दरम्यान आज (सोमवार) पूर्व नागपूर मतदारसंघात इच्छूक संगीता तलमले यांची परिवर्तन प्रचार रॅली सुरू केली आहे. नाना पटोले यांनी नागपूरातील सहाही जागांवर दावा केला होता. सोबतच इच्छूक उमेदवारांनाही काही सुचना केल्या होत्या. विशेष म्हणजे पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गट आणि पवार गटाचाही दावा आहे. असं असतानाही पक्षनेत्यांच्या सूचनेनुसार इच्छूक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे नागपुरात मविआमध्ये पुढे नेमकं काय होतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा